मालेगाव नवीन बस स्थानक परिसरात फिर्यादी मोहम्मद इल्ताफ अन्सारी यांची ६५,३००/- रुपयांची फसवणूक व चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह एका विधीसंघर्षित बालकास मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दि. ०४ डिसेंबर २०२४ रोजी चार अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीला रूम दाखवण्याच्या बहाण्याने एम.आय.डी.सी. परिसरातील सायाणेबुगा शिवारात नेऊन, ड्रग्ज विक्रीचा आरोप करत त्यांचे रोख ३८,०००/-, मोबाईल, चार्जर, आणि ट्रान्सफरद्वारे घेतलेली २२,०००/- रुपये रक्कम अशा एकूण ६५,३००/- रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला.
मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान, आरोपी अदनान खान मेहबुब खान (वय १९) व एका विधीसंघर्षित बालकाला इस्लामियाँ कॉलनीतून ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून ८५,०००/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. आरोपी अदनान खान याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्याकडून इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
